पिंपरी : एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाने दारू पिऊन चाळीतील एका महिलेची छेड काढली. त्याकारणावरून काही जणांनी त्याला मारहाण केली. सांगवी येथे १० मार्च रोजी झालेल्या या प्रकारात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. त्यामुक्षळे मुंबई येथील एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.दुखी नवलसिंग थापा, असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र गजेंद्र थापा (वय २२, रा. मुंब्रा कौसा, जि. ठाणे, मूळ रा. नेपाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखी थापा याला त्याचे काका प्रकाश उर्फ अजय थापा यांनी नवी सांगवी येथील एका बंगल्यात सुरक्षा रक्षकाचे काम मिळवून दिले होते. सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना १० मार्च रोजी दुखी याने दारु पिऊन तेथील एका चाळीतील महिलेची छेड काढली. या कारणावरून परिसरातील युवकांनी त्याला मारहाण केली. तसेच बंगल्याच्या मालकाने देखील सुरक्षारक्षक दुखी याला बांबूने मारहाण केली. त्यानंतर दुखी १८ मार्च रोजी तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला. तळोजा येथे आपल्याला दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली, अशी चुकीची माहिती दुखी याने तेथील भोईवाडा पोलिसांना दिली. त्यानंतर दुखी याच्यावर मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे २१ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास केला.तळोजा पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक तपास केला. सुरक्षारक्षक दुखी घटनेच्या दिवशी तळोजा येथे नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला मारहाण सांगवी येथे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून सांगवी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानुसार सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
चाळीतील महिलेची छेड काढल्याने बंगल्याच्या सुरक्षारक्षकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 2:57 PM
सुरक्षारक्षकाने दारु पिऊन तेथील चाळीतील एका महिलेची छेड काढली.
ठळक मुद्देअज्ञात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल