पिंपरी : कासारवाडीजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली. बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे बसच्या समोरच्या भागात अचानक आगीचा भडका झाला.त्यात बस जळून खाक झाली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. तातडीने बस थांबवून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
रविवारी शिवाजीनगर बस स्थानकातून सकाळी आठ वाजता श्रीरामपूरला शिवशाही सुटणार हाेती. त्याआधीच पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे या बसने पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक पप्पू आव्हाड यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग माेठ्याप्रमाणावर पसरली हाेती. एका सजग नागरिकाने अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाने काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. बस रिकामी असल्याने माेठा अनर्थ टळला. आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.