पिंपरी : ‘पीएमपीएल’च्या निगडी स्थानकाची बस दि. ३० रोजी महापालिकेवरून मुकाई चौकाकडे जाताना प्रवासी मुलीचा ६४ हजारांचा मोबाइल चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबविला, परंतु वाहकाच्या प्रसंगावधानाने तो तिला परत मिळाला. जणू रक्षाबंधनास भावाकडून बहिणीला ६४ हजारांची ओवाळणीच मिळाली.
पीएमपीच्या बसला रक्षाबंधनामुळे जादा गर्दी होती. शिवाजी महाराज पुतळा येथे बस थांबल्यानंतर काळेवाडीस जाण्यासाठी हितश्री बसमध्ये चढली. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिचा मोबाइल लांबवला. हा प्रकार तिने वाहकाला सांगितल्यानंतर त्यांनी तिला बसमध्ये चढतेवेळी पडला का, हे बघायला सांगितले. परंतु बसमध्ये आणि खालीही मोबाइल सापडला नाही.
मोबाइलचोर बसमध्ये बसला होता. वाहक नीलेश महाले यांना बसमधील एकावर संशय आला. काही अंतर पुढे गेल्यानंतर महाले यांनी बस थांबवून दरवाजा लॉक केला आणि मोबाइल कोणाला सापडला आहे का, याची विचारणा केली. उत्तर मिळाले नसल्याने महाले यांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल, मगच बस पुढे जाईल, असे सुनावताच चोरट्याने कबुली दिली. मोबाइल वाहकाकडे दिला. पोलिसांना बोलावण्यासाठी दरवाजा उघडला तेव्हा चोरटा पळून गेला. मोबाइलवर फोन आल्यानंतर हितश्री यांच्याशी संपर्क झाला आणि मोबाइल परत करण्यात आला.
आम्ही बसमध्ये काही घडले तर तत्काळ त्याची दखल घेतो. मी व माझे सहकारी योगेश गायकवाड यांनी रक्षाबंधनाला एका बहिणीला काहीतरी ओवाळणी दिली आहे. आमच्यासाठी हा मोठा आनंद आहे.
- नीलेश महाले, वाहक