पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पालिका बालभारतीकडून थेट पद्धतीने ३९ हजार ९४८ पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी २१ लाख ८० हजार ४३६ रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता खरेदीचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहे. शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर अद्यापही शालेय शिक्षण समिती अस्तित्वात येऊ शकलेले नाही. येत्या सर्वसाधारण सभेत नऊ सदस्यीय समितीची निवड केली जाणार आहे. समितीचे कामकाज वर्षभर सुरू झाले नसले तरी शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांसाठी पुस्तक खरेदी केली जाणार आहे. याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच शालेय साहित्य, स्वेटर, रेनकोट खरेदीविषयीही प्रशासनास निर्णय घ्यावे लागणार आहेत.शिक्षण समिती अस्तित्त्वात नसल्याने आयुक्तांच्या अधिकारात कामकाज केले जात आहे. प्रजासत्ताक दिनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केल्या गेलेल्या बिस्कीट पुडा व पाण्याची बाटली खरेदीसाठी एकूण १ लाख दहा हजार रुपये खर्चास मान्यता घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी भक्ती-शक्ती चौकात देशातील सर्वांत मोठ्या उंचीच्या ध्वजाचे उद्घाटन व ध्वजारोहणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व पाण्याच्या बाटल्या वाटप केले.
चाळीस हजार पुस्तके खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 7:07 AM