लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मोटार भाड्याने मागवून त्यात बसल्यानंतर कॅबचालकाला चाकूचा धाक दाखवून खाली उतरविले. साहित्यासह मोटार पळवून नेणारे चोरटे अवघ्या आठ तासांच्या आत पिंपरी पोलिसांनी जेरबंद केले. मोटार, टॅब, मोबाईल आणि रोख रक्कम अशा ५ लाख १२ हजार ३०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना पिंपरीगावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर खामाजी खल्लाळ (वय २६), सोमनाथ नरहरी सोलव (वय २२), कैलास सुरेश पडोळे (वय १९), भैरू हिराचंद गरड (वय २७) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री एक वाजता, त्र्यंबक देसाई (वय ३०) यांच्यामार्फत आरोपींनी मोटार मागवून घेतली. त्यात ५ जण बसले. काही अंतरावर गेल्यानंतर मोटार मागविणारा त्र्यंबक देसाई खाली उतरला. मोटारीतील चार आरोपींनी मोटारचालक दीपक म्हस्के याला चाकूचा धाक दाखवला. (एमएच ४४ - ४९०) ही मोटार घेऊन ते पसार झाले. मोटारचालक म्हस्के याने लगेच याबाबत पोलिसांना कळविले.मोटारीत मोबाईल, टॅब, रोख रक्कम असा एकूण ५ लाख १२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल होता. म्हस्के यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, तपासासाठी पोलिसांनी दोन शोध पथके तयार केली. मोबाईल टॉवर लोकेशन ट्रॅक करून मोटार मिळविण्यासाठी संपर्क साधलेल्या देसाईला पकडण्यात आले. त्याच्याकडून माहिती घेऊन इतर चार जणांना ताब्यात घेतले. देसाई हासुद्धा कॅबचालक आहे. त्याचा उपयोग करून चोरट्यांनी मोटार मागवून घेतली. चालकाला खाली उतरवून मोटार घेऊन ते पळून गेले होते. हे तरुण मराठवाड्यातील असून बेरोजगार असल्याने ते काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले असून एकाच ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत होते. अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकांत शिंदे, परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी ठाण्याच्या (गुन्हे शाखा) पथकाने आरोपींना पकडले.
कॅबचालकाची लुबाडणूक
By admin | Published: June 27, 2017 7:20 AM