पिंपरी : कपडे व भांडी स्वच्छ करण्याची पावडर विकायला आलेल्या दोघांनी हातचलाखीने दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. चिंचवडगाव येथे शुक्रवारी (दि. १५) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
अरुण दत्तात्रय धर्माधिकारी (७१, रा. गोखले पार्क, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्माधिकारी आणि त्यांची पत्नी शुक्रवारी दुपारी घरी होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण धर्माधिकारी यांच्या घरी आले. आम्ही उजाला पावडर विकायला आलो आहोत. कपडे तसेच तांबे व पितळीची भांडे स्वच्छ करून देतो, असे त्यांनी धर्माधिकारी यांना सांगितले. त्यानंतर तांब्याचे व पितळेचे भांडे पावडरने स्वच्छ करून देऊन फिर्यादी धर्माधिकारी व त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन केला. या भांड्यांप्रमाणेच आम्ही दागिनेही पाॅलिश करून देतो. त्यामुळे दागिने एकदम नव्यासारखे होतील, असे अनोळखी दोघांनी धर्माधिकारी यांना सांगितले.
तुमच्याकडचे दागिने द्या, ते स्वच्छ करून देतो, असे पावडर विकायला आलेले दोघेही म्हणाले. त्यानुसार धर्माधिकारी दाम्पत्याने त्यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीचे दागिने दोघांना दिले. त्यानंतर एका वाटीमध्ये हळदीचे पाणी करून त्यात पावडर टाकले. तसेच दागिने देखील त्यात टाकले असल्याचे सांगून हातचलाखीने ते दागिने दोघांनी घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवडचे पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.
हळदीचे पाणी करून दिशाभूल
वाटीतील हळदीचे पाणी गरम करून घ्या. त्यावर झाकण ठेवा. थोड्यावेळाने पाणी थंड झाल्यानंतर त्यातील दागिने काढा, ते दागिने स्वच्छ झालेले असतील, असे सांगून दोघेही फिर्यादी धर्माधिकारी यांच्या घरातून निघून गले. धर्माधिकारी यांनी हळदीचे पाणी गरम करून वाटीवर झाकण ठेवले. थोड्यावेळाने हळदीच्या पाण्यात दागिने पाहिले असता ते मिळून आले नाहीत. पावडर विकायला आलेल्या दोघांनी हातचलाखीने दागिने चाेरून नेल्याचे धर्माधिकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.