पिंपरी : लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुट पाटील यांचे नाव आल्याने पिंपरी-चिंचवडपोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुगुट पाटील यांची तडकाफडकी ‘अभियान’च्या सहायक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्याकडे देहूरोड विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
जमिनीच्या संदर्भात तक्रार अर्ज आल्यानंतर याप्रकरणात पाच लाखांची लाच मागण्यात आली. त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुट पाटील यांच्या सांगण्यावरून लाच मागितल्याचे खासगी व्यक्तीने सांगितल्याचे ‘एसीबी’ने सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली. लाचप्रकरणात सहायक पोलिस आयुक्तांचे नाव आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.
वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्याकडे देहूरोड विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यापूर्वी डाॅ. हिरे यांच्याकडे चिंचवड विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यानुसार डाॅ. हिरे यांच्याकडे सध्या वाकड, चिंचवड तसेच देहूरोड या तीन विभागांचा पदभार आहे.
एपीआय संलग्न, पीएसआय निलंबित
देहूरोड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक वसंत देवकाते यांना पोलिस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे.