वाकड : मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना मतदारांना प्रलोभने आणि आमिषे दाखवून मते पदरी पाडून घेण्यासाठी उमेदवारांची जणू स्पर्धा सुरूझाल्याचे चित्र शहरातील अनेक भागात आहे. ‘तेरी भी चूप मेरी चूप’ म्हणत निवडणूक आयोग आणि पोलिसांना लपत-छपत मतदार आणि उमेदवारात हा सावळा गोंधळ सुरू आहे, तर जिकडे-तिकडे ओल्या पार्ट्यांची चंगळ सुरु आहे. मतदारांना आमिष देणे आणि प्रलोभने दाखविणे कायदेशीर गुन्हा असल्याचे सुज्ञ मतदार आणि उमेदवार या दोघांनाही माहिती असताना देण्या-घेण्यासाठी दोघांचीही मोठी तगमग सुरू आहे. अशाच काहीशा घटना ताथवडे, पुनावळे आणि पिंपळे गुरव येथे घडल्या आहेत. मात्र, प्रचाराला अवघे दोन दिवस उरल्याने अनेक उमेदवारांनी प्रचाराऐवजी वाटपावर भर दिला आहे. काहींनी थेट वाटपासाठी सर्वांत सुरक्षित म्हणून पहाटेची वेळ निवडली आहे. मतदारांची आदल्या दिवशी यादी करून एक चिठ्ठी दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी चिठ्ठी घेऊन सतर्क राहून छुप्या पद्धतीने वाटप सुरू आहे. मतदारांना अगदी निर्जनस्थळी आणि सहजा-सहजी कोणाला पोहचता येणार नाही अशा ठिकाणी मतदान कार्ड घेऊन बोलावितात. तो एकटाच आला आहे का, याची खात्री करूनच ओळखपत्र पाहून त्याला देवतांची शपथ दिली जाते. मतदारही ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत मिळेल ते पदरात पाडून घेत आहेत. जसा अंधार पडू लागतो, तसा वाटपाच्या कामाला वेग येतो. समर्थक आणि प्रतिनिधी रात्री-अपरात्री तर काहीजण शांत डोक्याने अतिशय चलाखीने भर दिवसाच वाटप करीत आहेत. (वार्ताहर)- मतदारांना पैसे देण्याचा जोर वाढला असतानाच पोलीस आणि निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाचे पथक या हालचालींवर नजर ठेवून आहे. त्यातच पैसे वाटपाची बातमी वाऱ्यासारखी क्षणार्धात सर्वत्र पसरत असल्याने मतदार वाटपस्थळी झुंडीने दाखल होतात. त्यामुळे धोका न पत्करता दर अर्ध्या एक तासाने वाटप यंत्रणेला जागा बदलावी लागत आहे. मात्र विनाजोखीम आणि त्याच मतदाराला पैसे पोहोचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
प्रचारात उमेदवारांचा ‘रात्रीस खेळ चाले’
By admin | Published: February 19, 2017 4:41 AM