पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण अत्यल्प आहे. महाविद्यालयांच्या परिसरामध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाईक बाजूला उभी करूनही मैत्रिणीशी बोलता येईल की भावा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालये आणि इतर ठिकाणीही दुचाकी वाहने चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आकुर्डीत म्हाळसाकांत विद्यालय, ज्ञानप्रबोधिनी, डी.वाय. पाटील महाविद्यालय, पीसीईटी महाविद्यालय, पिंपरीत महात्मा फुले विद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय, चिंचवड गावात जैन हायस्कूल, भोसरीत लांडेवाडीतील महाविद्यालय, सांगवीतील बा. रा घोलप महाविद्यालय, संत तुकारामनगर परिसरातील डी.वाय. पाटील संकुल , वाकडमधील इंदिरा महाविद्यालय, जेएसपीएम महाविद्यालय, दापोडीतील जनता शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय परिसराची तसेच महापालिकेच्या काही विद्यालयांची पाहणी केली. त्यावेळी काही भागात मुले रस्त्यांच्या बाजूला गाडी न घेताच फोनवर बोलल्याचे आढळले.
कोणी मैत्रिणीशी बोलतं तर कोणी आईशी
चिंचवडमधील एका महाविद्यालयासमोर एक जण फोनवर बोलत होता. त्यास विचारले, साईडला गाडी घेऊन बोलावे. त्यावर तो म्हणाला, घरून फोन आला होता. त्यासाठी फोन घेतला. मी फोनवर बोलणे टाळतो. असे तो महाविद्यालयीन मुलगा म्हणाला. पिंपरीत एक मुलगा म्हणाला, मला एका ठिकाणी तातडीने पोहोचायचे होते, म्हणून फोन उचलला.
तीन महिन्यांत केला दंड
पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र हे प्रमाण कमी आहे. शहर परिसरात सोळा लाख वाहने आणि तीस लाख नागरिक वास्तव्यास आहेत. साडेसातशेहून अधिक विद्यालय आणि महाविद्यालये आहेत. फोनवर बोलणाऱ्यांची आकडेवारी मिळाली नाही; मात्र या महिन्यातील बेशिस्त चालकांवर कारवाई केल्याची आकडेवारी आहे. ४७५ जणांवर कारवाई केली. त्यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या ३१३ आणि ट्रीपलसीटने येणाऱ्या १५८ जणांवर कारवाई केली आहे.
दंड एक हजारापासून दहा हजारांपर्यंत
चालकांसाठी दंड वाढवूनही फरक झालेला नाही. दुचाकी-तीनचाकी, पहिल्यांदा हजार, दुसऱ्यांदा दहा हजार तर कारसाठी पहिल्यांदा दोन हजार, दुसऱ्यांदा दहा हजार आणि इतर वाहनांसाठी पहिल्यांदा चार हजार, दुसऱ्यांदा दहा हजार दंड केला आहे.