पिंपरी : संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराममहाराज, श्री ज्ञानेश्वरमहाराजांचा पावन स्पर्श झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात यंदा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल होणार आहे. शहरात होणारा हा पाश्चिमात्य फेस्टिव्हल रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे केली आहे.याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र दिले आहे. भापकर म्हणाले, ‘‘विजयादशमीनिमित्त संपूर्ण देशाला नागपूर (रेशीमबाग) येथून संबोधित करताना आमच्या युवक-युवतीच्या मनावरून विदेशी संस्कृतीचा प्रभाव दूर करायला हवा, असे सांगितले. तर दुसºया बाजूला संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज, गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या पुण्यभूमीत पाश्चिमात्य संस्कृतीने व्यापलेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलचे मोशी येथे आयोजन करण्यात येणार आहे.सोशल मीडियावर त्याची जाहिरात आणि आॅनलाइन तिकीट बुकिंग सुरू आहे. यामध्ये देशभरातील लाखो युवक-युवती सहभागी होणार आहेत.ही भूमी साधू-संतांची, शूर-वीरांची असून, टाळ-मृदंगाचा आवाज नादमय होण्याच्या भूमीत काही दिवसांत पॉप संगीताच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणी थिरकणार आहेत.ही या भूमीची, परंपरेची, संस्कृतीची शोकांतिका आहे. देशातील युवाशक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे. त्याच जोरावर भारत महासत्ता होऊ शकतो. त्याच युवक-युवतीच्या समोर महाराष्ट्र शासन काय आदर्श उभा करू इच्छिते? अशा कार्यक्रमामुळे समाजावर नेमके कसले संस्कार शासन करू इच्छिते?’’
सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:32 AM