पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा जोर वाढला असून, यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. यामध्ये दुचाकींच्या नंबरप्लेटवर उमेदवारांचे स्टिकर्स चिकटविण्यासह मोटारींवरील काचेवरही राजकीय नेत्यांच्या छबी पाहायला मिळत आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची, तर लगतच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. मतदानासाठी अवघा दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. प्रचाराचा जोर वाढला असताना, अनेक उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांककडून देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. वाहनांवर सर्रासपणे उमेदवारांचे फोटो चिकटविण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीच्या नंबरप्लेटवर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पाहायला मिळत आहेत. यामुळे वाहनाचा क्रमांक नजरेसच पडत नाही. शहरात अनेक ठिकाणी अशी वाहने पाहायला मिळत आहेत. यासह मोटारींच्या काचांवरही प्रचाराबाबतचे स्टिकर्स चिकटविल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत नाही. इतर वेळी सिग्नल तोडला, झेब्रा क्रॉसिंग केले अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, वेगवेगळी चित्रे चिकटवून मिरविणाऱ्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एखादी घटना घडल्यास त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. एखादी घटना, दुर्घटना घडल्यास संबंधित वाहनाचा शोध घ्यायचा असल्यास कसा घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशाप्रकारे बेकायदारीत्या धावणाऱ्या वाहनांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
वाहनांच्या नंबर प्लेटवर उमेदवाराची छबी
By admin | Published: February 14, 2017 2:07 AM