पिंपरी: पिंपरीमध्ये दुपारच्या सुमारास कार आणि रिक्षाचा अपघात झाला. भरधाव वेगाने पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली कार आणि खराळवाडीतून पिंपरीकडे निघालेली रिक्षा यांची दोरदार धडक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी सव्वा चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षामधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते मोकळे आहेत. मोकळ्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. दुपारी सव्वा चारच्या सुमारास पिंपरीतील बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर मोकळाच होता. यावेळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारूती स्विफ्ट कार (एम एच बारा क्यू डब्लू ७८१९) चालली होती. त्याच वेळी खराळवाडीकडून पिंपरीच्या दिशेने एक तीन चाकी रिक्षा निघाली होती. दोघाही चालकांना एकमेकांच्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहनांची धडक झाली. या अपघातात रिक्षातील दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर रिक्षा बँक ऑफ इंडियाच्या समोरील बीआरटी रोडच्या बॅरिकेड्सवर चढली. तर कारही बीआरटीचे बॅरिकेड तोडून थांबली. त्यानंतर काही क्षणात घटनास्थळी असणारे नागरिक आणि चौकात असणारे वाहतूक पोलीस धावले. त्यांनी जखमींना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहेत.