पिंपरी : ऑनलाईन अॅपव्दारे कपडे खरेदीसाठी पैसे तर दिले पण कपडे मिळालेच नाहीत पण खात्यातून रक्कम गायब झाल्याचा अनुभव एका ग्राहकाला आला आहे. या घटनेवरून फसवणुकीचा गुन्हा वाकडमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ३१ मार्च ते १३ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शिका राकेश सोमाणी (वय २७, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमाणी यांनी मोबाइल अॅप डाऊनलोड करून त्यावरून २ हजार ५५५ रुपयांचे कपडे खरेदी केले. बँक खात्यातून त्याची रक्कम कपात झाली. मात्र कपडे मिळालेच नाहीत. त्याची ऑनलाइन तक्रार दिल्यानंतर इ-मेलवरून आरोपीने त्यांचा मोबाइल क्रमांक मागवून त्यावर मेसेज पाठविला. तसेच दुसरा मोबाइल क्रमांकही दिला. तो मेसेज दुसऱ्या मोबाइलवर पाठवण्यास सांगितला. त्यानुसार फिर्यादी सोमाणी यांनी तो मेसेज आरोपीने दिलेल्या दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर पाठविला. त्यानंतर सोमाणी यांच्या बँक खात्यातून ६४ हजार ९९८ रुपये कपात झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.