पिंपरी : एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार पिंपरी कॅम्प येथे दि. २ डिसेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी वयोवृद्ध महिलेची केअरटेकर असलेल्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना सुरेश उत्तेकर (वय ४०, रा. रूपीनगर, निगडी) असे आरोपी केअरटेकर महिलेचे नाव आहे. पोलिसांनी उत्तेकर हिला अटक केली आहे. पिंपरी कॅम्प येथे ग्यानीबाई मुलचंद रामनानी (वय ८८) यांची केअरटेकर म्हणून आरोपी उत्तेकर या काम करीत होती. उत्तेकर दि. २ डिसेंबर रोजी ग्यानीबाई यांच्या घरी कामावर होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्यानीबाई झोपल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती एलआयसीचे पैसे भरण्याचे निमित्त करून घरात आला. झोपलेल्या ग्यानीबाई यांच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या एक लाख ३० हजारांच्या दोन बांगड्या अनोळखी व्यक्ती चोरून घेऊन गेला, अशी फिर्याद उत्तेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस निरीक्षक अशोक निमगिरे, हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, पोलीस नाईक श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, पोलीस कर्मचारी शहाजी धायगुडे, गणेश करपे, रोहित पिंजरकर, उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कर्ज फेडण्यासाठी केला चोरीचा बनावपोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, फिर्यादी रंजना उत्तेकर हिने सांगितलेल्या हकिगतबाबत साक्षंकता वाटू लागली. तसेच उत्तेकर हिने फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे कोणताही प्रकार झाल्याचे आठवत नाही, असे ग्यानीबाई यांनीही पोलिसांना सांगितले. त्यामुळे आरोपी उत्तेकर हिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्याकरीता चोरीचा बनाव केल्याचे उत्तेकर हिने सांगितले. पोलिसांनी सोन्याच्या दोन बांगड्या तिच्याकडून हस्तगत केल्या आहेत.