पिंपरी : बुलेटसाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्याला नकार दिल्याने विवाहितेचा छळ केला. पतीने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. तसेच सासरच्यांनी विवाहितेला तीन दिवस डांबून ठेवले. या प्रकरणी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथे आक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी विवाहितेने शुक्रवारी (दि. २४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विवाहितेचा पती किशोर दशरथ मोहिते (वय २५), दीर ईश्वर दशरथ मोहिते (वय ३०), दीर ज्ञानेश्वर दशरथ मोहिते (वय ३३), दीर संजय दशरथ मोहिते (वय ३५), सासरे दशरथ मोहिते (वय ६०) यांच्यासह सासू आणि तीन जाऊ (सर्व रा. पिंपळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) अशा नऊ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती आरोपी किशोर मोहिते याला नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी केली. फिर्यादी विवाहितेने माहेरून पैसे आणले नाहीत. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या पतीने फिर्यादीला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. आरोपींनी फिर्यादी विवाहितेला तीन दिवस घरामध्ये डांबून ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.