पिंपरी : सेपक टकरा (किक व्हॉलिबॉल) या खेळाचे बोगस प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनचे सचिव डॉ. सुखदेव बिश्वास, कृणाल अहिरे व इतर पदाधिकारी, बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेणारे यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्रीडा व युवक संचलनालयाचे सहाय्यक संचालक सुहास महादेव पाटील (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले जाते. त्याचा फायदा घेत आरोपींनी सेपक टकरा हा खेळ न खेळलेल्या व्यक्तींना बोगस प्रमाणपत्र दिली. या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीत त्यांनी सेवा संपादन केली आहे. त्यामुळे जे खेळाडू खरोखर खेळले त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. आरोपींनी आपापसात संगणमत करुन सरकारची फसवणूक केली. तसेच खरोखर खेळलेल्या खेळाडूंचीही त्यामुळे फसगत झाल्याचे फियार्दीत म्हटले आहे.