खडकी : अवघ्या दहा दिवसांच्या मुलीला नदीपात्रात फेकून तिचा खून करणा-या मातेचा जामीन विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी फेटाळला. रेश्मा रियासा शेख (वय २६, रा. दापोडी) असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे.खून केल्यानंतर बचावासाठी रिक्षाचालकाने मुलीला पळवून नेल्याचा बनाव करीत तिनेच खडकी पोलिसात फिर्याद दिली. ही घटना १६ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ ते साडेअकरा या कालावधीत बोपोडी येथील पाटील पुलाचे खालील नदीपात्रात घडली. रेश्माला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यानंतर तिला आणखी एक मुलगी झाली. मुलगी झाली आणि ती सतत जुलाब करत असल्याच्या कारणाने तिने मुलीला नदीपात्रात फेकून दिले.तिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. जामीन मिळाल्यास ती पळून जाण्याची अथवा आणखी हिंसक कृत्य करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला.बनाव उघडकीस...रिक्षाने बोपोडी सरकारी रुग्णालयास जाण्यास निघाले होते. त्या वेळी रिक्षाचालकाने आणि एका अनोखळी महिलेने मारहाण करून मुलीला पळवून नेल्याचा बनाव तिने केला होता. सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. ती चालत एकटीच मुलीला घेऊन गेल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे तिनेच बाळाचे बरे-वाईट केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार तिच्याकडे चौकशी केली असता तिनेच मुलीला नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी रेश्माला अटक केली. ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
खूनप्रकरणी जामीन फेटाळला, मातेनेच फेकले होते नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:42 AM