- हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी : देहूगावातून शहराच्या अनेक ठिकाणी जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, देहू ते निगडी दरम्यान बसचे तिकीट १५ रु. आहे. यामुळे सुटे पैसे नसल्यामुळे अनेक वेळा वाहक अन् प्रवाशांमध्ये झोंबाझोंबी होते. त्याचे कारण म्हणजे ५ रुपये सुटे पैशाचे निमित्त. पाच रुपयाचा मामला अन् प्रवासी व वाहकामध्ये राडा होत आहे.
प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांजवळ पाच रुपये सुटे नसतात. अशा वेळी वाहकाकडेही सुटे पैसे नसल्याने पाच रुपये माघारी देणे अवघड होते. त्यामुळे वाहक अन् प्रवाशांची तारांबळ होते. त्यावेळी वाहकाकडून प्रवाशाला सांगण्यात येते की, तुमचा स्टॅाप आल्यावर पाच रुपये तुम्हाला देतो. पण सुटे पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवासी व वाहकामध्ये वाद होतात. देहू ते निगडी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये नोकरदार, मजूर, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, गर्दी करतात. तिकीट हे पंधरा रुपये इतके असल्यामुळे वाहकाला पाच रुपये माघारी देणे खूप अवघड होते. त्यामध्ये पाच रुपये सुटे आणायचे तरी कुठून हा प्रश्न पडतो. सुटे पैसे नसल्यामुळे अनेक वेळा बाचाबाची होते. त्यामुळे वाहक वेळेवर पैसे देत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करतात. प्रसंगी मारामारी करण्याची वेळ येते.
वाहकाची उडवाउडवीची उत्तरे
अनेक वाहकाकांडून सांगण्यात येते की, सुटे पैसे उपलब्ध नाहीत. सुटे आले की देतो. मात्र, शेवटचे स्थानक येईपर्यंत सुटे नसल्याचे कारण सांगितले जाते. स्टॉप आला की देतो. असे सांगण्यात येते. वाहक प्रवाशांकडे दुर्लक्ष करतात. टाळाटाळा करताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे.
मी दररोज नोकरीसाठी देहूवरून निगडीला पीएमपीएलने प्रवास करते. दोनवेळा वाहकाकडे सुटे पैसे नव्हते, तर मी दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितले. की, माझे ५ रु. बाकी आहेत. पैसे द्या म्हणून वाहकाने त्याला विरोध केला. ते म्हणाले की, मी तुम्हाला ओळखत नाही. त्याचवेळेस मी त्यांना सांगिलते असे कसे नाही. ते म्हणाले दररोज अनेक प्रवाशी प्रवास करतात हे कसे लक्षात ठेवणार.
- पूजा कांबळे, महिला प्रवासी, देहूगाव.
नोकरीनिमित्त मी देहू ते हडपसर या मार्गाने नेहमी प्रवास करतो. दोन दिवसांपूर्वी हडपसर बसमधून प्रवास केला होता. त्यावेळी चालकाने मला ५ रुपये माघारी दिले नाहीत. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आम्ही पैसे नसते दिले तर तुम्ही बसमध्येदेखील घेत नाहीत. वाहकाने समजदारीतून प्रवाशांचे पैसे माघारी द्यावे.
-समाधान माने, प्रवासी, देहूगाव.
प्रवाशांनी प्रवास करताना जवळ सुटे पैसे ठेवणे गरजेचे आहे. वाहकानेदेखील आपले काम योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. वाहकाने सुटे पैसे सोबत ठेवावे. त्यामुळे वाद कमी होण्याची शक्यता आहे.
-सतीश गव्हाणे, पीएमपी वाहतूक व्यवस्थापक.