पिंपरी : जमिनीचा बेकायदेशीर व बळजबरीने ताबा घेतला. या प्रकरणी २८ जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. काटेवस्ती, पिंपळे सौदागर येथे १५ फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
नरेश ठाकुरदास वाधवानी (वय ५५, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गणेश नानासाहेब गायकवाड (रा. औंध) याच्यासह खेमचंद उत्तमचंद भोजवानी (वय ५८, रा. वाकडेवाडी, पुणे) कन्हैयालाल होतचंद मातानी (६३, रा. साधू वासवानी गार्डन, पिंपरी) यांच्यासह अन्य २५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोजवानी आणि मतानी यांनी आरोपी गायकवाड याच्या मदतीने फिर्यादीच्या जमिनीवर अवैध ताबा मारला. त्या जमिनीवर बेकायदेशीर पत्रा शेड उभारून तेथील दुकाने भाडेतत्त्वावर दिली. यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न आरोपींनी स्वतःसाठी वापरून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.
गायकवाड पिता-पुत्रांचे कारनामे औंध येथील नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश यांचे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी या पिता-पुत्रावर मोक्कांतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतरही काही जणांकडून तक्रारी करण्यात येत असून, गायकवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गणेश गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.