पिंपरी : हॉटेलमधील कामगारांचा पीएफ त्यांच्या पगारातून कमी केला. मात्र तो पीएफ कार्यालयात जमा न करता कामगारांची फसवणूक केली. बालेवाडी येथील वायरोका हॉटेल्स (रमाडा) येथे डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
हॉटेलचे संचालक वैभव लांबा, शरद श्रीमंत यादव यांच्या विरोधात या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ५) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांबा आणि यादव यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून ३३ हजार ९६८ रुपये भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली कमी केले. हे पैसे त्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कामगारांच्या नावे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्या करता वापरले. यामध्ये लांबा आणि यादव यांनी कामगारांचा व शासनाचा विश्वासघात करून रकमेचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.