पिंपरी : विधानसभेचे विरोधी पथनेता देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते शहरात रविवारी (दि. ६) विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले. यावेळी आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. फडणवीस यांच्या शहरातील दौऱ्यावेळी काळेझेंडे दाखवून घोषणा दिल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला.
संतोष लांडगे, सौरभ लांडगे, मारुती लांडगे, प्रशांत पवार, संजय उदवंत, राजेंद्र हरिश्चंद्र बिराजदार, नाना लांडगे, रणू बिराजदार, डंगू शिंदे, परशुराम पवार, अमर बिराजदार, अमित गुप्ता, शेखर गव्हाणे, चिम्या लांडगे (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) आणि इतर १५ ते २० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी सुरेश वाघमोडे यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. फडणवीस हे या उद्घाटनासाठी रविवारी (दि. ६) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास कार्यक्रम स्थळी आले असता आरोपींनी आंदोलन केले. काळे झेंडे तसेच घोषणा लिहिलेले फलक आरोपींकडे होते. ‘फडणवीस गो बॅक, भ्रष्टाचारी पिंपरी-चिंचवड भाजपा, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन आरोपींनी घोषणाबाजी केली. आरोपींनी घोषणा देत शांततेचा भंग केला, असे फिर्यादी नमूद आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन केल्याप्रकरणी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात चिखली आणि भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच फडणवीस यांचा वाहनांचा ताफा कार्यक्रमस्थळी पोहचत असताना त्यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.