लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएम सेंटरजवळ दोन अनोळखी इसमांची मदत घेतली. मात्र तीच त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरली. लोणावळ्यातील स्टेट बँकेमधून ग्रीन कॅश काऊंटरचा वापर करत या दोन भामट्यांनी तब्बल तीन लाख ४० हजारांची रोकड व अॅक्सिस बॅँकेमधून १४ हजार रुपये काढत पोबारा केला आहे. शनिवारी (दि. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी सुशील धोंडिबा धनकवडे (वय ६१, रा. जाखमाता मंदिराशेजारी, तुंगार्ली, लोणावळा) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीच्या फुटेजमधील त्या दोन अज्ञात चोरट्यांना धनकवडे यांनी ओळखले असून त्या आधारे लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.धनकवडे हे ३१ मे रोजी रेल्वेमधून सेवा निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युएटी व फंडाची रक्कम रुपये १३ लाख त्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया लोणावळा शाखेत जमा केली होती. पैकी १० लाख रुपये त्यांनी पत्नीच्या दुसºया खात्यावर जमा केले होती. पेन्शनची रक्कम धरुन तीन लाख ६८ हजार ४३९ रुपये त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा होते. शनिवारी सकाळी त्यांनी कॅनरा बँकेच्या एटीएम मधून चार हजार रुपये काढले व स्टेट बँकेच्या एटीएम मधून १० हजार रुपये काढण्यासाठी एटीएममध्ये उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीची मदत घेतली.त्या व्यक्तींकडे पैसे काढण्यासाठी कार्ड व पिन क्रमांक दिला. त्या व्यक्तीने धनकवडे यांना दहा हजार रुपये काढून दिले व सोबत धनकवडे यांच्या कार्ड सारखे दिसणारे दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले. धनकवडे गेल्यानंतर कार्डच्या व पिन क्रमांकाच्या सहाय्याने आरोपींनी स्टेट बँक व अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून तब्बल तीन लाख ५४ हजार रुपये काढले.
एटीएम कार्डद्वारे साडेतीन लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:14 AM