वाकड : ताथवडे परिसरात एका गोदामात महिला मतदारांना पैसे वाटप केल्याची दोन दिवसांपूर्वीची घटना चर्चेत असताना, गुरुवारी पुनावळे परिसरात एका मोटारीतून एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलीस, तसेच निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाने धाव घेऊन या मोटारीची तपासणी केली असता, त्यात सव्वातीन लाखांची रोकड आढळून आली. निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाचे अधिकारी, पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. पंचनामा करून मोटारीतील तीन लाखांची रोकड तसेच मोटारीसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटारचालकाकडे रकमेविषयी अधिक चौकशी केली असता, घरबांधणीसाठी गावाकडून ही रक्कम कर्ज काढून आणली आहे, असे तो सांगू लागला. पोलिसांनी मोटारीत आढळून आलेली रक्कम आणि मोटारीसह चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत. मात्र एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची ही रोकड असल्याचा संशय आहे. (वार्ताहर)
मोटारीत आढळली तीन लाखांची रोकड
By admin | Published: February 17, 2017 4:58 AM