पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्याने कॅश काउंटरवर घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याने बोगस पावतीद्वारे लाखो रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याची बदली करून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० बेडचे वायसीएम रुग्णालय आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालय असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. रुग्णालयात ओपीडी बंद झाल्यानंतर अत्यावश्यक विभागाचे कॅश काउंटर सुरु असते. रुग्णालयातील ४४ नंबरच्या एका ‘कॅश काउंटर’ वर दुपारनंतर नातेवाईकांची सतत वर्दळ असते. दररोज हजारो रुपयांच्या पावत्यांद्वारे रोख रक्कम रुग्णालयात जमा होत होती. महापालिकेत काम करणाऱ्या एका मोठ्या ठेकेदारी कंपनीचा हा कर्मचारी आहे. गेल्या दहा महिन्यापासून रुग्णालयात जमा होणारी रोख रक्कम तो कर्मचारी हडप करत होता. दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत रुग्णालयातील कॅश काउंटरवर तो काम करत होता. या कर्मचाऱ्याने बोगस पावत्या तयार करून वायसीएम रुग्णालयाच्या लाखो रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र असे असतानाही महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्याचे निलंबन न करता रुग्णालयातच इतर विभागात बदली केली आहे. तर कॅश काउंटरवर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित कर्मचाऱ्याने अपहार केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयातील हे कॅश काउंटर तात्काळ बंद करण्यात आले असून त्या कंत्राटी कर्मचाऱ्याची इतरत्र बदली केली आहे. जानेवारीपासून त्याने केलेल्या सर्व पावत्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात तफावत आढळून येत आहे. या प्रकाराची गांभिर्याने दखल घेतली असून रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरु आहे. सद्यस्थितीत त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.