पिंपरी : शहरातील पिंपरी आणि दापोडीसह विविध बौद्धविहारात धम्मचक्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ या वेळी सकाळपासूनच विविध बौद्धविहारात सूत्तपठण करण्यात आले़ तसेच पंचशील ध्वजवंदनाने धम्मचक्र दिनाची सुरुवात करण्यात आली़ पिंपरीतील डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अनेक उपासक-उपासिकेनी पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून वंदन केले़ तसेच धम्मदिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ दापोडीतील डॉ़ आंबेडकरांच्या पुतळ्यास फुलांनी सजविण्यात आले होते़ चहूबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ मंगळवारी पहाटेपासून अनेक अनुयायींनी या ठिकाणी दर्शनास हजेरी लावली़ विजयादशमीच्या दिवशी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती़ तो दिवस धम्मचक्र दिन म्हणून साजरा केला जातो़ या दिवशी पहाटेपासून बुद्धवंदना, सुूत्तपठण, पंचशील ध्वजारोहन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते़ पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन आणि निळे झेंडे मिरवत तरुणांनी धम्मचक्र दिन आनंदात साजरा केला़ ठिकठिकाणच्या बौद्धविहारात भीमगीतांनी आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता़ विजयादशमी आणि धम्मचक्र दिन एकाच दिवशी साजरा करीत असल्यामुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक सामाजिक संस्था, समाजसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी बौद्ध बांधवांना शुभेच्छा दिल्या़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात पोहचविण्यासाठी काम करण्याचा संकल्प उपस्थित बौद्ध अनुयायांनी केला़ (प्रतिनिधी)
शहरात धम्मचक्र दिन उत्साहात साजरा
By admin | Published: October 12, 2016 2:07 AM