लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : धावडे वस्ती येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, पेव्हिंग ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत आहेत. तर स्वच्छतागृहाच्या भिंतींना तडे गेले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाकडे कित्येक वेळा स्थानिक रहिवाशांनी येथील कामे करण्याबाबत निवेदने दिली असून, दुरुस्तीची कामे होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. भोसरी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी सहा दिवस दुरुस्तीसाठी बंद ठेवली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे़ महापालिकेच्या वतीने विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. या विद्युत दाहिनीची कॉईल आणि पॅनेल नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने सोमवार (दि. २६) पासून ही विद्युत दाहिनी बंद ठेवण्यात आली आहे. येथे कोणतेही दुरुस्तीचे काम चालू नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. जुनी स्मशानभूमी दुरुस्त करण्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते.दुरवस्था : घाणीचे पसरले साम्राज्यस्मशानभूमीतील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले असून ही भिंत कधीही ढासळू शकते, अशी अवस्था आहे. ठिकठिकाणी खिडक्यांच्या काचा गायब असून फरशा उखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नव्या इमारती बांधण्याची गरज असताना जुन्या सुविधांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्मशानभूमी बंद असल्याने हाल
By admin | Published: July 02, 2017 2:36 AM