पिंपरी : सीआयएफमध्ये अधिकारी असून बदली झाली असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर घरातील सामान विक्रीच्या बहाण्याने दोघांनी एका व्यक्तीची १८ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ३१ जुलै रोजी देहूगाव येथे घडला. याप्रकरणी पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल केला.
विकास मुकुंद निकम (वय ३१, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सीमित कुमार, श्रीकांत सिंग यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम हे फेसबुक मार्केटवर जाहिरात पाहत होते. त्यात सीमित कुमार याने त्याच्या घरातील सामान विकण्याबाबत जाहिरात दिली होती. सीमित कुमार याने तो सीआयएफमध्ये असून त्याची बदली झाली असल्याने त्याला त्याच्या घरातील सामान विकायचे असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये निकम यांची आरोपी सीमित कुमार याच्यासोबत ओळख झाली.
सीमित कुमार याने निकम यांना सामान पाठवले असून ते ट्रान्सपोर्टमध्ये अडकले आहे. तिथून ते पुढे पाठवतो असे आरोपीने सांगितले. सीमित कुमार याने श्रीकांत सिंग याचा मोबाईल क्रमांक पाठवला. श्रीकांत याने निकम यांच्याकडून १८ हजार रुपये घेऊन त्यांना सामान न पाठवता त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.