पिंपरी : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, डी.फार्म., कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान आदींच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (दि. १०) राज्यभरात एमएचटी सीईटी ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची बैठक व्यवस्था व इतर तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पुणे विभागातून १ लाख ४ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. पुणे जिल्ह्यात १११ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना सकाळी सव्वानऊ वाजता परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल. गणिताचा पहिला पेपर १० वाजता सुरू होईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या पालकांनी एक दिवस अगोदरच परीक्षा केंद्रास भेट देऊन परीक्षेला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याचे नियोजन करावे. त्यासाठी सर्व परीक्षा केंद्रे बुधवार, दि. ९ मे रोजी विद्यार्थी व पालकांसाठी खुली ठेवण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक दिलीप नंदनवार यांनी दिली आहे.परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र उमेदवारांना वेबसाइटवर त्यांच्या लॉग-इनमधून आॅनलाइन २४ एप्रिलपासून उपलब्ध होत आहेत व ते परीक्षेच्या दिनांकापर्यंत डाउनलोड करून घेता येतील. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रावरील उमेदवारांच्या छायाचित्रांची खात्री पटविण्यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, लायसन्स, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधारकार्ड, फोटो असलेले बँक पासबुक, राजपत्रित अधिकारी यांनी निर्गमित केलेले आणि छायाचित्र असणारे ओळखपत्र, मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय यांनी चालू शैक्षणिक वर्षामध्ये दिलेले फोटोसहित ओळखपत्र यापैकी एक मूळ कागदपत्र बाळगणे आवश्यक आहे.परीक्षा केंद्रात केवळ बॉलपेन,पाणी व रायटिंग पॅडच नेता येणार४एमएच सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोबत फक्त काळ्या शाईचा बॉलपेन (दोन), पाण्याची बाटली व लिखाणाचा पारदर्शक पुठ्ठा इतकेच साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास परवानगी आहे. याव्यतिरिक्त पुस्तके, बॅगा, मोबाइल, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल इत्यादी साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास परवानगी नाही. प्रवेशपत्र व ओळखपत्र याव्यतिरिक्त अन्य चिठ्ठ्या उमेदवाराजवळ नाहीत, याची परीक्षार्थी उमेदवारांनी परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी खात्री करावी. प्रश्नपुस्तिकेमध्ये कच्च्या कामासाठी कोरे पृष्ठ ठेवलेले असेल. त्याच पृष्ठावर परीक्षार्थींनी कच्चे काम करावे, असे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सीईटीची व्यवस्था प्रशासनाकडून पूर्ण, आज होणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:52 AM