पिंपरी : आयटी नगरी म्हणुन जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतुक कोंडीचा प्रश्न जटील झाला होता. पिंपरी चिंचवडला नव्याने झालेल्या पोलीस आयुक्तालयात रूजू झाल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी हिंजवडी, वाकड येथील वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास प्राधान्य दिले. सप्टेंबरमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, हिंजवडी ग्रामस्थांशी संवाद साधून वाहतुक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले. चक्राकार एकेरी वाहतूक असाही प्रयोग केला. नागरिकांच्या सूचना, हरकती जाणून घेतल्या. या बदलामुळे वाहतुक कोंडी समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणावर यश आले. त्यामुळे सप्टेबर मध्ये करण्यात आलेली चक्राकार एकेरी वाहतुक व्यवस्था आहे, तशीच यापुढेही ठेवण्याचा निर्णय वाहतुक विभागाने घेतला आहे. शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रो सर्कल फेज १ येथून उजवीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल चौक येथून वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल. शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसगाड्या, तसेच इतर जड वाहने यांना वाकड पुलाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास, तसेच यू टर्न घेण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून पेट्रोल पंप चौकातून इच्छित स्थळी जाता येईल. जांभूळकर जीम, पेट्रोल पंपाजवळील आऊट मर्ज स्थानिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. इंडियन आॅईल पेट्रोल पंप ते शिवाजी चौक दरम्यान आऊट मर्ज, तसेच शिवाजी चौक ते फेज १ सर्कल डिव्हायडर पंक्चर, फेज १ ते जॉमेट्रिक सर्कल दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर, मेझा ९ ते शिवाजी चौक दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर बंद करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे. भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज १ येथून सरळ पुढे जावे. मेझा ९ चौकातून वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. माणगाव रस्त्याने विप्रो सर्कल फेज २ चौकातून शिवाजी चौकाकडे सरकळ जाण्यास बंदी करण्यात आला आहे. सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल येथून इच्छित स्थळी जावे. फेज २, ३ कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रिक सर्कलच्या चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून जावे. असे परिपत्रक वाहतुक विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे.
हिंजवडीतील चक्राकार एकेरी वाहतुक कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 4:08 PM
नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे.
ठळक मुद्देप्रायोगिक तत्वावरील बदलांतुन घेतला निर्णय आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, हिंजवडी ग्रामस्थांशी संवाद साधून तात्पुरते बदल