पिंपरी : महापालिका निवडणुकीत सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना मतदारदूताची भूमिका पार पाडावी लागणार आहे. आपल्या सोसायटीत शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी त्यांना जागृती करावी लागणार आहे. महापालिका व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे काम करण्याची सूचना सहकार विभागाने केली आहे. मात्र, आत्तापर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधील साडेतीनशे ते चारशे सोसायट्यांमध्ये सहकार विभागाला पोचता आले आहे. त्यामुळे कमी कालावधीत शहरातील पंधरा हजार सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सहकार विभागाला पेलावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यात मतदार जागृतीसाठीच्या उपाययोजनांवर देखील चर्चा झाली. त्या नुसार महापालिकांनी मतदार जागृतीसाठी मोठे फलक करुन प्रत्येक सोसायटीच्या ठिकाणी दर्शनी भागात झळकविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या साठी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांनी संस्थेच्या बैठकीत नैतिकतेने व निश्चितपणे मतदान करण्याचे आवाहन सभासदांना करावे, असे पत्रकच सहकार विभागाने काढले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काय कार्यवाही केली याचा अहवाल सहकार आयुक्तालयाला सादर करण्याचा आदेशही त्यात देण्यात आला आहे. सहकार विभागाने गृहनिर्माण सोसायट्यांमधून मतदान जागृतीसाठी सुरूवात केली असून, पिंपळे-गुरव, कोंढवा, वानवडी, खराडी, नऱ्हे आंबेगाव येथील तीनशे ते साडेतीनशे सोसायट्यांमधे पत्रके व सभांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. तसेच संबंधित सोसायटीच्या अध्यक्षांना शंभर टक्के मतदानासाठी सभा, मेळावे अथवा पथनाट्य याद्वारे जागृती करण्यास सांगण्यात येत असल्याची माहिती सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे पंधरा हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे या संस्थांपर्यंत पोचण्यासाठी सहकार विभागाला कसरत करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)
सोसायट्यांतर्फे पोहोचण्याचे आव्हान
By admin | Published: February 06, 2017 6:04 AM