पिंपरी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बदलाचा धसका घेत वाहनचालकांनी एक दिवस आधीच प्रवासाचे नियोजन केले. त्यामुळे शनिवारी दुपारपासून सुतारवाडी ते चांदणी चौक दरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यात वाहतूक नियमन करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
पुणे येथील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. १) रात्री अकरापासून वाहतुकीत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई तसेच पिंपरी-चिंचवड येथून सातारा व कोल्हापूरकडे जाणाऱ्या नागरिकांनी एक दिवस आधीच म्हणजेच शनिवारी प्रवासाचे नियोजन केले. त्यामुळे शनिवारी दुपारपासून मुंबई-बंगळूर महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी झाली. रस्त्यावर अचानक आलेल्या वाहनांच्या या लोंढ्याने वाहनांचा वेग मंदावून खोळंबा झाला. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून वाहतूक नियमन केले जात आहे.
सव्वाशे पोलीस रस्त्यावर
चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी मुंबई-बंगळूर महामार्गावर उर्सेटोल नाका येथून वाहतुकीत बदल केला आहे. उर्से टोल नाका ते चांदणी चौका दरम्यान ठिकठिकाणी असा बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून २५ अधिकारी आणि १०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करण्यात येत आहे.
क्रेन, टोईंगची व्यवस्था
भर रस्त्यात बंद पडलेले वाहन हलविण्यासाठी क्रेन तसेच टोईंगची व्यवस्था केली आहे. गुगल मॅपवरून देखील वाहतूक कोंडी आदीबाबतचा आढावा घेतला जात आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी. तसेच पोलिसांना सहकार्य करावे.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड