चंद्रकांत पाटलांची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’; अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 01:27 PM2022-10-09T13:27:37+5:302022-10-09T13:28:12+5:30

आई- वडिलांना शिव्या देण्याच्या विधानावर घेतला समाचार

Chandrakant Patal Destructive Intellect Criticism of Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’; अजित पवारांची टीका

चंद्रकांत पाटलांची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’; अजित पवारांची टीका

Next

पिंपरी : भाजपचे चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री केल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून ‘आई- वडिलांना शिव्या द्या; पण पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना काही म्हणू नका’, असे त्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांचे असे बोलणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे, अशी टीका करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यामुळे सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. दोन व्यक्तींनाच काय कोणालाच शिव्या देऊ नका. आपला इतिहास, पंरपरा तशी नाही. स्वत:च्या आई- वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असल्याचा टोला पवार यांनी लगावला.

सरकार लांबवतेय निवडणुका...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका लांबवायच्या आहेत. अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी किती दिवस प्रशासन ठेवायचे यालाही मर्यादा असतात. आता कोरोनाही संपला आहे. तुम्ही मुंबईमध्ये पोटनिवडणूक लावू शकता. मात्र, महापालिका निवडणुका घेत नाही, यावरून सर्व प्रकार लक्षात येतो. सद्यस्थितीत इच्छुकांचाही खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनी आता खर्चाला थोडा आवर घालावा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

Web Title: Chandrakant Patal Destructive Intellect Criticism of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.