- नारायण बडगुजर
पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. १७) पिंपरी-चिंचवड शहरात दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार? असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल केला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भाजपाचे माजी नगरसेवक हर्षल मच्छिंद्र ढोरे (वय ४६, रा. जुनी सांगवी) याप्रकरणी शनिवारी (दि. १७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सोशल मीडिया सेल, चिंचवड अध्यक्ष विकास लोले आणि दशरथ बाबूराव पाटील (रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी यात्रेचे आयेाजन केले आहे. या यात्रेतील कार्यक्रमासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सांगवी येथे दौरा जाहीर करण्यात आला. यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाईफेक झाली होती. त्या घटनेचा आधार घेऊन समाजामध्ये असंतोष व तेढ निर्माण करण्यासाठी आरोपींनी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात व्हायरल केला.
आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पो. सांगवी, पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या, मु. पो. सांगवी (पवनाथडी यात्रा), चंपाचे तोंड काळे केले रे, असा मजकूर विकास लोले याने फेसबुकवर प्रसारित करून चिथावणी दिली. तसेच दशरथ पाटील याने तो मजकूर व्हाॅटसअप स्टेटसवर ठेवून चिथावणी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानाव पवनाथडी यात्रेत मंत्री चंद्रकांत पाटील येणार म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली आहे.