लोणावळा : मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात घरे पडल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यु झाला तर एक मुलगी जखमी झाली होती. या मृतांच्या नातेवाईकांची व जखमी मुलीची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व वित्तमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेत त्यांना तातडीच्या मदतीचे चार लाख रुपयांचे धनादेश सुपुर्द केले.
यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्रांत अधिकारी सुभाष भागडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी याठिकाणी पत्राचाळीत एक घर पडल्याने कुणाल दोडके या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला होता तर त्याची नऊ वर्षाची बहिन जखमी झाली होती. ही घटना ताजी असताना सोमवारी पहाटे पुन्हा भांगरवाडी याठिकाणी दुमजली घर पडत जयप्रकाश नायडू या नागरिकाचा मृत्यु झाला. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची तातडीने मदत देण्याचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जाहिर केले होते. यानुसार आज पालकमंत्री व मदत व पुर्नवसन राज्यमंत्री यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.