देहूगाव (पुणे) : कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर देहूत श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही समस्या येऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून काही वाहनांना १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात देहूत प्रवेश बंदी करण्यात आलेली असल्याची माहिती तळवडे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.
२० नोव्हेंबरला श्री क्षेत्र आळंदीची यात्रा असल्याने या कालावधीत श्री क्षेत्र देहूगाव येथे श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, त्यांना यात्रेत वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी तळवडे व देहूरोड वाहतूक विभागाने नियोजन केले आहे. या नियोजनाप्रमाणे भाविकांनी वाहने पार्किंग करावीत व वाहतूक नियमनाला सहकार्य करण्याचे आवाहन वाघमोडे यांनी केले आहे.
१८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर वाहनांची वर्दळ व गर्दीचा आढावा घेऊन या काळात वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. प्रामुख्याने देहूमध्ये येण्यासाठी तीन मार्ग आहेत. या मार्गावर हे बदल केले आहेत.
१) यात्रा काळात निगडी ते देहूगावाकडे कोणतेही अवजड व कमर्शियल वाहने आणि कारखान्यातील कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस येणार नाही. मात्र, या मार्गांनी जाणाऱ्या वाहनांनी भक्तिशक्ती चौक, त्रिवेणीनगर मार्गे तळवडे गावात येऊन चाकणकडे किंवा आळंदीकडे जावे.
२) तळेगाव-चाकण मार्गांनी देहूफाटा येथून देहूत येणाऱ्या वाहनांसाठी देहूफाटा येथे अवजड व कमर्शियल वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वाहनांनी निघोजे येथील महिंद्रा सर्कल येथून मोई फाटा, डायमंड चौकातून इप्सित ठिकाणी जावे.
३) देहू-आळंदी रोड या मार्गांनी येणाऱ्या अवजड व कमर्शियल वाहनांसाठी कॅनबे चौक तळवडे येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी तळवडे-निगडी मार्गाने इप्सित ठिकाणी जावे. या मार्गावरील भाविकांची होणारी गर्दी व त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.
यात्रा काळात येथे असतील बसस्थानके :
१) देहूरोड- देहू रस्त्यावर अनगडशहा वली दर्ग्याच्या जवळ पीएमपीएमलसाठी थांबा दिलेला आहे. २) मारुती काळोखे चौक येथील पालिकेच्या जुन्या जकात नाक्यासमोरील मोकळ्या जागेत पीएमपीएमएल व एसटी बसेससाठी थांब्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.