पुणे : महसूल विभागाच्या वतीने पुणे आणि नागपूर विभाग वगळता अन्य सर्व विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या ३१ मे पूर्वीच बदल्या करण्यात आल्या. परंतु पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणामुळे अडचणीत सापडल्यामुळेच पुणे आणि नागपूर येथील महसूलच्या बदल्या रखडल्या असल्याची जोरदार चर्चा अधिका-यांमध्ये सुरु झाल्या आहेत. विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आपले अधिकार वापरून रात्री उशीरा तहसिलदारांच्या बदल्या करण्याची शक्यता होती, मात्र मंत्रालयातून शासनाच्या सहमती शिवाय बदल्या करू नका अशा सूचना आल्याने या बदल्या रखडल्या असल्याचे बोलले जात आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने फेबु्रवारी २०१७ मध्ये तीन वर्षे पूर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्यामध्ये बदल्या करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. या निकषानुसार पुणे विभागात मोठ्या प्रमाणात सुमारे ५६ तहसिलदार आणि ४८ उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सध्या असलेला जिल्हा, स्वग्राम असलेला जिल्हा आणि सध्या एक्झिक्युटीव्ह पदावर असलेल्यानी (कार्यकारी) पद सोडून बदलीसाठी चॉईस देण्याचे सांगितले आहे. त्यात बदलीसाठी कोणीही भेटायचे नाही, अशी सक्त सूचना देखील आयुक्तांनी दिल्या होत्या. आदेशानुसार ३१ मे पूर्वी प्रशासकीय बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत. ते वापरूनच आयुक्तांनी २३ नायब तहसिलदारांच्या बदल्या केल्या. तहसिलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या देखील बदल्या करण्यासाठी आयुक्त रात्री उशीरापर्यंत कार्यालयामध्ये बसून होते. परंतु मंत्रालयातून शासनाच्या सहमती शिवाय तहसिलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करू नका अशा सूचना आल्या. यामुळे पुणे विभागातील बदल्या अखेर झाल्याच नाहीत. (प्रतिनिधी)
पुणे, नागपूर विभागात बदल्या रखडल्या
By admin | Published: June 02, 2016 12:27 AM