पिंपरी : पवना धरण परिक्षेत्र, मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पवना नदीला पूर आला आहे. मुळशी तसेच खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
लोणावळा परिसरात अतिवृष्टी होत आहे. तसेच मुळशी खोऱ्यातही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे इंद्रायणी व मुळा नदीला पूर येऊन पाणी पातळीत वाढ होत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर पाणी आले असल्याने काही भागातील वाहतूक बदल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. जुनी सांगवी ते स्पायसर कॉलेज जवळील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद केली आहे. वाकड येथील सावित्रीबाई फुले उद्यान व कस्पटे चौक येथील वाहतूकही बंद केली आहे. काळेवाडी चौकाकडून मानकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचले आहे. त्यामुळे यामार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली आहे. कस्पटे चौक व वाकड नाका येथील वाहतुकीतही बदल केले आहेत. चापेकर चौक ते मोरया गोसावी मंदिर तसेच धनेश्वर मंदिर ते स्मशासभुमीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आलेला आहे. कुदळवाडी ते मोई दरम्यानचा पूल बॅरिकेड्स टाकून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे.
खेड तालुक्यातील काही मार्गांवरही बदलखेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे नदीचे पाणी आल्याने रस्ता बंद केला आहे. शिक्रापूर ते चाकणकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. देहूरोडकडून मामुर्डी - सांगवडेकडे जाणारा रस्ता नदीला पाणी आल्याने लोखंडी पूल बंद केला आहे.