पिंपरी : पिंपळे सौदागर येथील जमिनीची खरेदी व विकसन हक्क करार फिर्यादी व त्यांचे भागीदार कन्हैय्यालाल होतचंद मतानी यांना प्राप्त झाला होता. अशा परिस्थितीत, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता प्रमुख आरोपी बांधकाम व्यावसायिक नरेश वाधवानी यांनी या जमिनीचे खरेदी व विकसनाचे हक्क स्वत:कडे घेतले. फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवानी यांच्यासह जनाबाई जयंवत काटे, सुरेश जयवंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, वैशाली चंद्रकांत काटे अशी आरोपींची नावे आहेत. संबंधित जमिनीचे विकसनाचे हक्क एम़ बी़ डेव्हलपर्सतर्फे फिर्यादी तसेच त्यांचे भागीदार कन्हैय्यालाल मतानी यांना आॅक्टोबर २०१० मध्ये मिळाले आहेत.सर्व्हे क्रमांक ४० मधील ३६.३८८० गुंठे जमिनीचे ओम डेव्हलपर्स यांच्याकडून विकसन आणि खरेदीचे हक्क त्यांनी प्राप्त केले. मात्र मंगलमूर्ती डेव्हलपर्सतर्फे बिल्डर नरेश वाधवानी यांनी जमिनीचे मूळ मालक काटे व त्यांच्या वारसांबरोबर संगनमत करून हवेली दुय्यम निबंधक कार्यालय येथे सर्च टायटल रिपोर्ट न घेता, स्वत:च्या नावे दस्तनोंदणी केली.महिनाभरात दुसरा गुन्हाहयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट सह्या करून खरेदीखत केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वाधवानी यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध शांताराम बर्डे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २०१५ मध्ये चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पिंपरी न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश चिंचवड पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार चिंचवड पोलिसांनी न्यायालयास अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते.न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती.जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर २२ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. बिल्डर वाधवानी यांच्याविरुद्ध महिनाभरात हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा सांगवीत दाखल झाला आहे.
बिल्डर नरेश वाधवानीविरुद्ध गुन्हा, सहा कोटींची फसवणूक, पिंपळे सौदागरच्या सहा जणांवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 5:53 AM