पिंपरी : दगड, माती, विटा असलेला राडारोडा ट्रॉलीमधून आणून पवना नदीपात्रात टाकला. कासारवाडी येथे शुक्रवारी (दि. ९) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नदीपात्राच्याप्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मुन्ना डामोर (वय ३०) व सचिन शहा (दोघेही रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार बाबासाहेब शिंदे (वय ५२, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता आहेत. आरोपी सचिन शहा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर आरोपी राकेश डामोर ट्रॅक्टरचालक आहे.
आरोपी शहा याच्या सांगण्यावरून आरोपी राकेश याने दगड, माती, विटा असलेला राडारोडा ट्रॅक्टरट्रॉलीमधून आणून नदीपात्रात टाकला. कासारवाडी येथे पिंपळे गुरव रस्त्याला लागून असलेल्या दत्त मंदिराजवळ पवना नदीत राडारोडा टाकण्यात येत होता. त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले. त्यामुळे महापालिका पर्यावरण विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार शिंदे यांनी याबाबत तक्रार केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.