पिंपरी : चार्जिंगसाठी रिक्षात लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. मोबाइल चार्जिंगला लावून रिक्षाचालक जवळच पाणी पिण्यासाठी गेला असल्याने दुर्घटना टळली. ही घटना निगडी येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.रिक्षाचालक गहिनीनाथ सातपुते नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडले. निगडीतील रस्त्यालगत रिक्षा उभी करून ते पाणी पिण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेले. तेवढ्यात मोठा आवाज आला आणि रिक्षातून धूर निघाला. आवाज ऐकून सातपुते यांनी रिक्षाकडे धाव घेतली असता चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्याच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्याचे दृश्य त्यांना पहावयास मिळाले.मोबाइलचा स्फोट झाला त्या वेळी सातपुते रिक्षात असते, तर गंभीर जखमी झाले असते. सुदैवाने ते रिक्षाच्या बाहेर असताना हा स्फोट झाला. सातपुते म्हणाले, की मी नेहमीच रिक्षात मोबाईल चार्ज करतो. ओव्हरचार्जिंग कधीही होऊ देत नाही. याआधी कधीही असा प्रकार घडला नाही. या घटनेमुळे दक्षता घेण्याचा धडा मिळाला आहे
चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट, रिक्षाचालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 2:23 AM