पिंपरी : सरकारच्या मुद्रा योजनेतून लोन देतो, असे म्हणून कागदपत्रे घेतली. लोन मंजुरच होणार आहे त्यासाठी विविध कारणे सांगून तब्बल आठ लाख ८२ हजार ४३४ रुपये व्यावसायिकाकडून घेतले. ही घटना गुरुवारी (दि.५) रावेत येथे घडली. या प्रकरणी गोपिचंद देवराम काटे (वय ४६, रा. काटेवस्ती, पुनावळे, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपीचंद काटे यांना एका अनओळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो मुद्रा फायनान्स एमएसएमई मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथून बोलत असल्याने सांगितले. मुद्रा योजने अंतर्गत कर्ज हवे आहे का, अशी विचारणा त्याने केली. गोपीचंद यांनी कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर संशयिताने त्यांच्याकडून व्हॉट्सअपवर पॅनकार्ड, आधारकार्ड, जीएसटी प्रमाणपत्र, आदी कागदपत्रांचे फोटो मागवून घेतले. तसेच वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून सात लाख ८२ हजार ४३४ रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन फसवणूक केली.