पिंपरी : घरकामासाठी महिला मिळावी,यासाठी पिंपरीतील एका महिलेने जस्ट डायलवर संपर्क साधला. घरकामाला महिला उपलब्ध व्हावी, याबद्दल माहिती मागवली. त्यानंतर एका अनोळखी व्यकतीने त्यांना संपर्क साधला. दोन महिलांची माहिती, छायाचित्रासह पाठवली. तसेच एका बँक खात्यावर १५ हजार रूपये भरण्यास सांगितले. त्यानुसार आॅनलाईन रक्कम भरली. नंतर मात्र घरकामासाठी महिला मिळाली नाही, रक्कमही परत न मिळाल्याने अनोळखी मोबाईलधारकाविरूद्ध २ जानेवारीला पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत राहणाºया संध्या सुर्यवंशी (वय ६०) यांनी पोलिसांकडे फसवणुक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करण्यासाठी दोन महिलांची गरज आहे. घरकाम करणाºया महिंलाबद्दल माहिती मिळविण्यासाठी त्यांनी जस्ट डायलवर संपर्क साधला होता. त्यानंतर काही वेळाने एका अनोळखी व्यकतीने त्यांच्याशी संपर्क साधून घरकामासाठी दोन महिला उपलब्ध होतील, असे सांगितले.
एवढेच नव्हे तर दोन महिलांची छायाचित्र तसेच नाव, पत्ता अशी माहितीसुद्धा व्हॉटसअॅपवर पाठवली. संबंधित महिलेचा विश्वास संपादन करून त्याच्या बँक खात्यात १५ हजार रूपये आॅनलाईन भरण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतर मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. ही घटना १७ डिसेंबरला घडली. मात्र संबंधिताकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे २ जानेवारीला सुर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली आहे.