पिंपरी : विश्वास संपादन करून सात लाख सहा हजार रुपये किमतीचा ११ टन पास्ता ऑर्डर केला. त्यानंतर ट्रकमधून पाच लाख ४८ हजार रुपये किमतीच्या पास्ताचे ५५० बॉक्स उतरवून घेऊन फसवणूक केली. मोशी टोलनाका येथे १५ डिसेंबर २०१९ ते ८ जानेवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
नागेश रायेश्वर हेगडे (वय ४७, रा. ठाणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद मीना, भावेश व यूवराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी गोविंद मीना यांच्यात पास्ता व्वयवसायासंदर्भात फोनवर वारंवार चर्चा झाली. त्यामुळे फिर्यादी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यातून ते त्यांना कंपनीच्या वतीने माल देण्यास तयार झाले. त्यानंतर आरोपी यांनी इ-मेलवरून पर्चेस ऑर्डर व दोन धनादेश दिले. तसेच आरोपी भावेश हा फिर्यादी यांच्या ठाणे येथील घरी गेला. तेथे फिर्यादी यांची भेट घेतली. गॅरेंटर म्हणून दोन धनादेश देऊन भावेश याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सात लाख सहा हजार रुपयांचा पिस्ता ऑर्डर केला. त्यानुसार हरियाणा येथील कर्नाल येथून एका ट्रकमध्ये पास्ता माल पाठविण्यात आला. दि. ८ जानेवारी रोजी ट्रक मोशी टोलनाका येथे आला असता तेथे आरोपी गोविंद मीना याने त्याच्या ओळखीचा आरोपी युवराज यास ट्रक घेऊन पाठवून दिले. युवराज याने त्याच्या सोबत आणलेल्या ट्रकमध्ये पाच लाख ४८ हजार रुपये किमतीच्या पास्त्याचे ५५० बॉक्स ठेवून घेतले. फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असून, गोविंद मीना यांना फोन करायचा आहे, असे सांगून युवराज याने कंपनीकडून आलेल्या ट्रकच्या चालकाकडून फोन घेतला. त्यानंतर तो तेथून पास्त्याचे बॉक्स व फोन असा एकूण पाच लाख ५८ हजारांचा ऐवज घेऊन जाऊन फिर्यादी व कंपनीची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.