पिंपरी : पैसे हात उसने घेत आहे, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेकडून ६५ लाख ६६ हजार ५२० रुपये घेऊन ते परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथे २०१७ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
सुरेखा दीपक जगताप (वय ४७, रा. तापकीर नगर, काळेवाडी) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. संतोष कचरू भांगरे, छाया संतोष भांगरे (दोन्ही रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियारी यांचे पती दीपक जगताप यांची आरोपी संतोष भांगरे यांच्याशी ओळख झाली. शेअर मार्केटमध्ये काम करतो, तसेच सिव्हिल इंजिनियर आहे व माझ्या स्वतःच्या जमिनी आहेत. यापूर्वी अनेक जणांनी माझ्याकडे पैसे गुंतवले होते. त्या पैशांचा मला व्यवसायात फायदा झाला व मी त्यांचे पैसे परत करून त्यांना जादा मोबदला दिला. सध्या मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही मला काही पैसे द्या, मी तुम्हाला त्याच्या बदल्यात जादा मोबदला देऊन तुमचे पैसे परत करील, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. आरोपी संतोष आणि त्याची पत्नी छाया फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पैसे हात उसने घेत आहे, असे आरोपींनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. त्यानंतर आरटीजीएस व रोख स्वरूपात ६५ लाख ६६ हजार ५२० रुपये घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणूक केली.