पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला आता दबंग अधिकारी मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अंतर्गत गटबाजी,अपुरी यंत्रणा, कामाचा ताण तणाव, हप्तेखोरी व राजकीय हस्तक्षेप ही आव्हाने नवीन आयुक्तांसमोर असणार आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मी शहरात आहे तोपर्यंत अवैध धंदे करणाऱ्यांनी व व्हाईट कॉलर गुन्हेगारांनी आपआपले धंदे बंद करावेत अथवा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी अशा कडक शब्दात स्पष्ट इशारा दिला आहे. त्यासाठी माझा इतिहास तपासून पाहा असेही ठणकावले आहे.
औद्योगिक नगरी असे बिरुदावली असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय होऊन होऊन 2 वर्ष झाले आहे.या कालावधीत 2 पोलीस आयुक्त पिंपरीला मिळाले. कुणालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. तसेच या पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर सुद्धा शहरातील गुन्हे गारीचा आलेख हा उंचावातच आहे. मात्र आता नव्याने नियुक्त झालेले व तिसरे आयुक्त व धडाकेबाज व दबंग अधिकारी अशी ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्याहाती सूत्रे आल्यानंतर मात्र पिंपरी शहर वासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत
नवनियुक्त पोलीस आयुक्तांसमोरची आव्हाने:
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताना आपली कार्यपद्धती कशी असेल हे स्पष्ट केले. आव्हान पेलणे हा कर्मयोगीचा धर्म असतो.असे सांगत गुन्हेगारांना एकप्रकारे स्पष्ट इशाराच दिला आहे. मात्र अवैध धंदे, घरफोड्या, वाहन तोडफोडी आणि चोरीच्या घटना, सायबर क्राईमचा चढता आलेख, लँड माफिया,खून, मारहाण, खंडणी आदी गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान कृष्ण प्रकाश यांच्यापुढे असणार आहे.
खांदेपालट करून काम करावे लागणार
शहरातील घडामोडींचा अभ्यास करून आपली कार्यपद्धती दाखवण्यासाठी खांदेपालट करून काम करावे लागणार आहे. बस्तान बसवलेल्यांची झाडाझडती देखील नवीन आयुक्तांना घ्यावी लागणार आहे.