लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : पवना नदीच्या स्वच्छ पाण्यास शिरगाव, सोमाटणे परिसरास उग्र वासाने ग्रासले आहे. स्वच्छ अशा पाण्याला काळा रंग चढल्याने नदीला ग्रहण लागल्यासारखे दिसत आहे. ठिकठिकाणी गावांमधील सांडपाणी नदीत सोडल्याने रसायनयुक्त पाण्याने नदीच्या पाण्याचा मूळ रंग बदलून काळसर रंग चढला आहे. पवन मावळातील धामणे, सोमाटणे, शिरगाव, गोदुंब्रे, साळुंंब्रे, दारुंब्रे, गहुंजे आदी नदी काठांवरील गावांमधील सांडपाणी हे थेट नदी पत्रात मिसळत आहे. याच परिसरात असलेला साखर कारखान्याचे पाणी दारुंब्रे ओढ्यात सोडले जाते. हे पाणी काही प्रमाणात शेतकरी शेतीकरिता वापरतात. परंतु काही पाणी हे थेट नदीत मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात अधिकच भर पडत आहे. गावोगावची धार्मिक स्थळे, मंदिरे यांचे सांडपाणीही नदीपात्रात जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. उर्से परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात पोहचत असल्याने येथील पाण्यात असणारे रसायन नदी पात्रातील पाण्यात मिसळले जात असल्याने धामणे, सोमाटणे, शिरगाव, भागातील नदीच्या पाण्याचा उग्र रसायनाचा वास येत आहे. सोमाटणे परिसरात नागरीकरण वाढत असून उद्योग, दवाखाने, हॉटेल्सची संख्या वाढत आहे. काही हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून नदी पात्रात टाकत आहेत. त्या तीरावरील झाडांमध्ये अडकून पडत आहेत. नदी पात्रात अनेक धार्मिक विधी पार पडले जातात तेव्हा प्लॅस्टिक कॅरिबॅग, पत्रावळ्या आदी नदी पात्रात टाकल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व पाण्याबरोबर वाहत न जाता कोठेतरी अडकून राहते त्यामुळे नदी प्रवाहास अडथळा निर्माण होत असून नदीपात्राचे विद्रुपीकरण होत आहे. दूषित पाण्यामुळे नदीच्या कडेला जलपर्णीचा विळखा वाढत आहे.
रसायनमिश्रित सांडपाणी पवनेत
By admin | Published: May 12, 2017 5:04 AM