शशिकांत जाधव / तळवडेसंत तुकाराम महाराजांच्या वैकुठगमन सोहळ्यात चिखली येथे महाराजांचे टाळ विसावले त्यामुळे चिखली गावाला टाळगाव चिखली असे बिरुद मिळाले. याच चिखली गावातून देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणारी आणि वारकरी संप्रदायात प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी इंद्रायणी नदी वाहते. मात्र, या पवित्र इंद्रायणीला या भागात प्रदूषणाचा विळखा पडला असल्याने गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या स्मशानभूमीच्या जवळून एक मोरी बनवण्यात आली आहे. या मोरीमधून सातत्याने गटाराचे, दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात मिसळत असते. या गटाराच्या पाण्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. येथील स्मशानभूमीच्या घाटावर असलेल्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.सर्वच नद्यांच्या प्रदूषण होण्यास कारणीभूत असलेली जलपर्णी येथेही वाढली आहे. पात्रात काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त प्रदूषित असलेल्या पाण्यात येथे राहणारे परप्रांतीय मासेमारी करत असतात. प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.इंद्रायणीचे प्रदूषण रोखणे अतिशय गरजेचे आहे़ यासाठी येथील नागरिक, सामाजिक संस्था, महापालिकेचा पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडून उपाययोजना करणे तसेच प्रदूषणास जबाबदार घटकांवर दंडात्मक कारवाई झाल्यास प्रदूषणास आळा बसेल. इंद्रायणीला पुन्हा एकदा पूर्वी चे निर्मळ वैभव प्राप्त होईल, असे पर्यावरणप्रेमी नागरिक बोलतात.
रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत
By admin | Published: April 25, 2017 4:09 AM