चाकण : शहरातील सामान्यांच्या आरोग्याशी काहीही घेणे-देणे नसणाऱ्या नफेखोर कंपन्या त्यांच्या कारखान्यातील कचरा, राडारोडा व केमिकलमिश्रित काळीमाती बिनदिक्कतपणे नदीपात्रात फेकत आहेत. त्यामुळे नदीचा मात्र श्वास गुदमरू लागला आहे. इंद्रायणी पुलाजवळील नदीपात्रालगत हा सारा कचरा टाकला जात आहे, त्यामुळे नदीपात्रातील पाणी अत्यंत प्रदूषित होत आहे. हे सारे राडारोडा टाकण्याचे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, चाकणमधील एका फाउंड्रीमधील केमिकलमिश्रित काळीमाती नदीपात्रात व महामार्गाच्या बाजूला टाकत आहे. त्यामुळे नदीपात्र दूषित होऊन; तसेच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्यांत, नाकातोंडात जाऊन अनेकदा अपघात झालेले आहेत, केमिकलमिश्रित काळीमाती उडाल्याने जनावरांच्या पोटात जाऊन जनावरेही दगावलेली आहेत.महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. एका बाजूला गणपती विसर्जनामुळे नदी प्रदूषित होते, त्यामुळे गणपती हौदात बुडवावेत, असे आवाहन प्रदूषण मंडळ करते आणि नदीपात्रात हजारो टन फाउंड्रीमधील केमिकलमिश्रित काळीमाती नदीपात्रात टाकली जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. फाउंड्रीमधील वेस्टमटेरियल शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करावयास बोर्डाकडून अधिकृत एजन्सी नेमलेल्या असताना, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवरच संशयाची सुई फिरत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाने संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करून नदीपात्रात टाकली जाणारी केमिकलमिश्रित काळीमाती बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
केमिकलने गुदमरतोय नदीचा श्वास
By admin | Published: November 09, 2016 2:34 AM