पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा करण्यासाठी अटल संकल्प महासंमेलन नसून पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पाठींबा देणाऱ्या मित्र पक्षाचा खासदार संसदेत पाठवू. मित्र पक्षांनी मोदींना साथ न दिल्यास मावळ आणि शिरूर मधून उमेदवार देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगडी येथे शिवसेनेला उद्देशून दिला.
शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. या मतदार सघांत लोकसभा निवडणूकीचा अटल संकल्प महासंमेलनाद्वारे नारळ भाजपाने फोडला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाची युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपाने शिवसेनेच्या जागांवर दावा केला आहे. अशी चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या गडाविषयी नेते काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती.
युतीविषयी मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, ‘‘मावळ आणि शिरूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पिंपरी-चिंचवड शहरात होत असताना आम्ही शिवसेनेच्या जागांवर दावा करतोय का? अशी चर्चा रंगली होती. हा मतदार संघावर दावा करण्यासाठी मेळावा नाही. तेच खासदार आम्ही निवडून देऊ. जे मोदींना पाठींबा देतील. मोदींना पाठींबा देणाऱ्या मित्रपक्षाचाही खासदार निवडूण देऊ. मित्र पक्षांनी साथ न दिल्यास संसदेपर्यंत भाजपाचेच खासदार असतील. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हेच आमचे उमेदवार असतील. संसदेपर्यंत हेच प्रतिनिधी पाठवू.’’ असा गर्भित इशाराही शिवसेनेला दिला.