पिंपरी : शहरातील पुरग्रस्तांसाठी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि.५) दुपारी सांगवी येथे आले होेते. मुख्यमंत्री शिंदे हे येणार असल्याने परिसरात सकाळपासून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच महापालिकेच्या वतीने मार्गावरील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात आली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर शाळेत येऊन पूरग्रस्तांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्तांना चादर तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना उशीर, नागरिकांचे हाल...
मुख्यमंत्र्यांची पावणे एकची वेळ होती. मात्र त्यांना नियोजित वेळेहून अधिक वेळ लागला. त्यामुळे पूरग्रस्तांना या ठिकाणी ताटकळत बसवून ठेवण्यात आले. जुनी सांगवी येथील मुळानगर येथे बंजारा समाजातील नागरिकांची झोपडीवजा घरे आहेत. या नागरिकांना मुळा नदीला आल्याच्या पुराचा फटका बसला आहे. सकाळी दहानंतर पुर ओसरायला सुरूवात झाल्याने नागरिक घरांकडे जाण्यासाठी घाई करू लागले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.
सांगवी येथील गजानन महाराज मंदिरासमोरील मैदान पावसामुळे चिखलमय झाले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याने सोमवारी सकाळीच महापालिका प्रशासनाकडून तात्काळ खडी, व मुरूम टाकून मैदानाची दुरुस्ती करण्यात आली. तसेच परिसरातील खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना या रस्त्याची व मैदानाची दुरावस्था दूर झाल्याची चर्चा रंगली होती.
जेवणाऐवजी वडापाव..
अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. दुपारपर्यंत या नागरिकांना वेळेवर जेवणही पुरविण्यात आले नव्हते. त्यामुळे या लोकांची अवस्था बंदिस्त कैद्याप्रमाणे झाली होती. अखेर एकच्या सुमारास या नागरिकांना वडा पाव देऊन शांत बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामधील अनेक नागरिक खोलीबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना बाहेर जाण्यापासून रोखण्यात आले.